करोडोंचा निधी गेला पाण्यात



उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ): आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय अशी अवस्था उरण मध्ये झाली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणे घेणे आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.उरण तालुक्यातील सर्व रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे.तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने एका पावसात चाळण झालेल्या या रस्त्यांवर खर्च केलेला करोडोंचा निधी खड्डयात गेल्याची संतप्त भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
भौगोलिक दृष्ट्या उरण तालुक्याचा विचार करता उरण तालुका हा सखल विभाग असलेला तालुका आहे.पूर्व विभागात डोंगर पट्टा व पश्चिम विभागात खाडीपट्टा अशी भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या या तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे पसरले आहे.प्रवाशी वाहतुकीच्या रस्त्यांबरोबरच जेएनपीटी बंदराच्या अवजड वाहतुकीचा भार या रस्त्यांवर पडला जातो. त्यामुळे उरण तालुक्यातील रस्त्यांवर दरवर्षी सिडको,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हापरिषद,जेएनपीटी, यांच्या मार्फत करोडोंचा निधी खर्च केला जातो.मात्र ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे करोडोंचा खर्च होऊनही तालुक्यातील रस्ते दरवर्षी खराब होतात. हे सत्र यावर्षीही कायम असून दिघोडे दास्तान फाटा,कोप्रोली-खोपटा -उरण,उरण-पनवेल या,जेएनपीटी कडे जाणारे रस्ते ,बीएमसीटी बंदराकडे जाणाऱ्या पुलावरील खड्डे तसेच या रस्त्यांबरोबरच सिडकोच्या द्रोणागिरी विभागातील रस्त्यावर खड्डे झाले आहेत.रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण होऊन त्यामध्ये चिखल मातीचे पाणी साठले आहे.त्यामुळे वाहन कसे चालवावे या प्रश्नाने वाहन चालक त्रस्त आहेत.या मोठमोठ्या खड्यांमुळे दुचाकी वाहनांचे सतत अपघात घडत असून गेल्या काही वर्षात उरणच्या या रस्त्यांवर सुमारे हजार च्या वर तरुणांचा बळी गेला आहे.त्यामधील अनेक अपघात हे रस्त्यावरील खड्डयांमुळे झाले आहेत.
उरण तालुक्यात जेएनपीटी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची साठवणूक करण्यासाठी अनेक गोदामे निर्माण झाली आहेत.या गोदामात माल आणणाऱ्या अवजड कंटेनर ट्रेलर्स मुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डये निर्माण झाले आहेत.या अनिर्बंध अवजड वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने उरणच्या रस्त्यांची दैन्यावस्था झाली आहे.पर्यायाने हे खड्डये अपघातांना आमंत्रण ठरत आहेत.या खड्डयामुळे व खराब रस्त्यामुळे आजपर्यंत 1000 हुन जास्त छोटे मोठे अपघात झालेले आहेत.तरीही प्रशासनाला जाग येताना दिसून येत नाही.
ज्या ठेकेदाराने रस्त्यांची कामे केली आहे आणि लवकर खराब झाली आहेत त्यांना आम्ही नोटीस काढली आहेत.जिथे जिथे खड्डे पडले आहेत ते आम्ही बुंजण्याची कामे करीत आहेत.पाऊस गेल्यानंतर त्या रस्त्यांची डांबरी करणं केले जाईल. – नरेश पवार, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता.
दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी करोडोंचा निधी सिडको,सार्वजनिक बांधकाम विभाग जेएनपीटी ,नॅशनल अथोरिटी खर्च करीत असतात.त्यातच या विभागातील अधिकाऱ्यांच्या मर्जीतीलच ठेकेदाराला कंत्राट देऊन फुटलेल्या रस्त्यांचा तकलादू विकास केला जातो.या करोडोंचा विकास निधीमुळे ठेकेदार व अधिकारी मात्र मालामाल होत असल्याचे विदारक चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे.निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या व निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून दरवर्षी केली जाते पण शासकीय अधिकारी व ठेकेदारावर कोणतेही कायदेशीर कारवाई होताना दिसून येत नाही.
दरवर्षी हे रस्ते बनले जातात आणि खराब होतात ठेकेदाराकडून कोणतीही कॉलिटी मेंटन केली जात नाही .त्यामुळे ह्या रस्त्यावर खड्डे पडत आहे.या कडे मात्र अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.- सत्यवान भगतमनसे तालुका अध्यक्ष
