महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कौतुकाची थाप

रत्नागिरी : चंदीगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील आरवलीची सुकन्या असलेल्या रुई विनायक विचारे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राला एनसीसी कॅडेट्सनी सलग दुसऱ्या वर्षी प्रथम विजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (19 जुलै ) रुईसह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केला.
चंदीगड येथे दिनांक ६ जुलै रोजी पार पडलेल्या आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध गटांमधून 17 कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यात सध्या शिक्षणानिमित्त पुणे येथे असलेल्या रई विचारे हिचाही समावेश होता. मूळची संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेली रुई विचारे ही सध्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्रामधून चंदीगडमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या रुई विचारे हिने ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिने तिच्या गटातून खेळताना संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पन्नास मीटर रायफल शूटिंगमध्ये तामिळनाडूतील मुलीने प्रथम तर रुईने विचारे हिने दुसरे स्थान पटकावले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सनी महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून दिले. याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कॅडेट्सना मंगळवारी 19 जुलैला राजभवनात बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

यावेळी एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कमोडोर सतपाल सिंह, ब्रिगेडियर सी. मधुवाल, नेमबाजी चमूचे प्रभारी अधिकारी कर्नल सतीश शिंदे, तसेच नेमबाजी स्पर्धेतील स्पर्धक उपस्थित होते.
