गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 29 ऑगस्ट रोजी धर्मवीर एक्सप्रेस सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. कोविड संकटातील प्रदीर्घ कालावधीनंतर यावेळी प्रथमच मोकळ्या वातावरणात गणेशोत्सव होत असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जणार असल्यामुळे ठाणे ते थिविम अशी धर्मवीर एक्सप्रेस म्हणून अनारक्षित गाडी सोडण्याची मागणी ठाणे येथे नोंदणीकृत असलेल्या कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी असलेलला गणेशोत्सव लक्षात घेता दिनांक 29 ऑगस्ट रोजी ठाणे येथून थिवीसाठी एक दिवसीय अनारक्षित धर्मवीर एक्सप्रेस सोडण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे, अध्यक्ष सुजित सुरेश लोंढे तसेच सचिव दर्शन पांडुरंग कासले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


