कोंडमळा येथे शेतातील चिखलात रंगला भातलावणी स्पर्धेचा थरार!

जिल्हास्तरीय आमदार चषक लावणी स्पर्धेत साहिल चाळके, दिलीप चिले यांच्या बैलजोड्या प्रथम

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे बुधवारी भात शेतातील चिखलात आयोजित केलेल्या सामूहिक शेत लावणी व नांगरणी स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी चिपळूणसह विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर शेतीप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती.  या स्पर्धेत गावठी बैल जोडी प्रकारात साहिल चाळके तर घाटी बैलजोडी प्रकारात दिलीप चिले यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. 

चिपळूणचे आमदार आमदार शेखर निकम यांच्या नावाने आमदार चषक 2022 अशी ही जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये गावठी बैल जोडी प्रकारात प्रथम क्रमांकासाठी सात हजार द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार, तृतीय क्रमांकासाठी तीन हजार तर चौथ्या क्रमांकासाठी एक हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. घाटी बैलजोडी प्रकारात प्रथम क्रमांकासाठी आठ हजार, द्वितीय क्रमांकासाठी सहा हजार, तृतीय क्रमांकासाठी चार हजार तर चौथ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. युवा वर्गाचा शेतीकडे कल वाढावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकणात पावसाळ्यात अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत गावठी बैल जोडी प्रकारात दुसरा क्रमांक अमोल जाधव तिसरा क्रमांक हुमणे गुरुजी, तर चौथा क्रमांक रमेश बारकू बाईत यांनी पटकावला. 

लावणी स्पर्धेत घाटि बैलजोडी प्रकारात दुसरा क्रमांक मनोहर चाळके तिसरा क्रमांक अमित पवार तर चौथा क्रमांक मारुती ओकटे यांच्या बैलजोडीने पटकावला. ही स्पर्धा पाहण्यासाठी चिपळूण तसेच संगमेश्वर तालुक्यातील शेतीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे महामार्गानजिक ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE