थीवी-रत्नागिरी उद्या इलेक्ट्रीक लोकोची स्पीड ट्रायल

कोरे’च्या रत्नागिरी-वेर्णा विद्युतीकृत मार्गाचे सीआरएस इन्स्पेक्शन
आज अंतिम टप्प्यातील सुरक्षा तपासणी; सीआरएस स्पेशल उद्या सोलापूरला

रत्नागिरी : रत्नागिरी ते गोव्यातील वेर्णा या कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण पूर्ण झालेल्या अंतिम टप्प्यातील रेल्वे मार्गावर सीआरएस (कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी) तपासणी सुरु झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांचा यासाठीचा दौरा मंगळवारपासून सुरु झाला आहे. गुरुवारपर्यंत ही सीआरआस तपासणी चालणार आहे. गुरुवारी सायंकाळी ‘सीआरएस स्पेशल ट्रेन’ रत्नागिरी येथून सोलापूरला जंक्शनसाठी रवाना होणार आहे.
दरम्यान, सुरक्षा आयुक्तांच्या निरीक्षण दौर्‍यानंतर आता कोकण रेल्वेचा कोलाड (रायगड)ते ठोकूर (कर्नाटक) हा 738 कि.मी.चा संपूर्ण मार्ग विद्युत इंजिनवर गाड्या धावण्यासाठी सज्ज होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार आधी मालगाड्या तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या तर त्या पाठोपाठ इतर गाड्या या जसजसा इलेक्ट्रीक लोको पुरवठा होईल, तशा सध्या डिझेल इंजिन ऐवजी विजेवर धावणारी इंजिन जोडून चालवल्या जाणार आहेत.
सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या तपासणी दरम्यान रत्नागिरी ते वेर्णा मार्गावरील पानवल पूल, निवसर आडवली दरम्यानचे रेल्वे वळण, आडवली यार्ड, बेर्डेवाडी टनेल, विलवडे सौंदळ दरम्यानचे डोंगर कटींग, राजापूर एसएसपी, वैभववाडी अचिर्णे दरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट, कणकवली टीएसएस (ट्रॅक्शन सब- स्टेशन) आणि ओव्हरहेड वायर डेपो, कणकवली सिंधुदुर्ग दरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट 25, सिंधुदुर्ग कुडाळ दरम्यान कर्ली नदी पूल, झाराप स्वीचिंग पोस्ट, पेडणे टनेल यांची पाहणी करुन अधिकारी, अभियंत्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
थीवी ते रत्नागरी आज ‘स्पीड ट्रायल’
सीआरएस मनोज अरोरा यांच्या कोकण रेल्वे मार्गावरील सीआरएस कार्यक्रमा अंतर्गत गुरुवार दि. 24 रोजी स्पेशल ट्रेन सकाळी 10 वाजता मडगाव ते थीवी अशी ‘नॉन इन्स्पेशन ट्रेन’ म्हणून धावेल. तिथून पुढे थीवी ते रत्नागिरी या 190 किलोमीटर अंतरात विद्युत इंजिनसह सीआरएस स्पेशल ट्रेन वेग चाचणी घेण्यासाठी चालवली आहे. ही विशेष ट्रेन दुपारी 1 वाजता रत्नागिरी स्थानकावर दाखल होणार आहे. त्या नंतर रात्री 9 वा. 40 मिनिटांनी सीआरएस स्पेशल ट्रेन रोहा येथून सोलापूर जंक्शनला त्या विभागातील इन्स्पेक्शनसाठी रवाना होणार आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी वेर्णा सीआरएस निरीक्षणक कार्यक्रमा अंतर्गत टिके टनेलच्या मुखाशी थांबून पाहणी करताना सेंट्रल सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा. सोबत तज्ज्ञांचा समावेश असलेले पथक.


Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE