दोन्ही घाटरस्ता सर्वेक्षणासाठी मार्च 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्येकी रु. 5 कोटीचा निधीची तरतूद
देवरूख (सुरेश सप्रे): गेली अनेक वर्ष शासनाच्या विचारधीन असलेला मळेघाट निवळी नेरद मार्गे पाटण घाट रस्ता व हरपुडे- कुंडी घाट रस्त्याचे अर्धवट पडलेले काम सुरू होणे अत्यावश्यक आहे. अशी तालुक्यातील जनतेची मागणी होती या मागणीचा विचार करता चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष रोहन बने यांनी राज्याचे तत्काळीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ओरस येथे झालेल्या कोकण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये हा विषय प्रामुख्याने उपस्थित केला त्यावेळी सदर घाटरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री स्व. मधु दंडवते यांनी खासदार असताना याचा आग्रह केला होता. माजी राज्यमंत्री रविंद्र माने माजी आमदार सुभाष बने यांनीसुध्दा या घाटमाथ्याच्या रस्त्यांसाठी कमालीचे प्रयत्न केले होते. व युतीशासनाच्या काळात या दोन्ही घाटाचे काम हि सुरू झाले होते. नंतर हे काम काही तांत्रिक अडचणी व निधीची न झालेली तरतुद यामुळे बंद पडले होते..

मात्र आम. शेखर निकम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्च 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे तत्काळीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी बजेट अंतर्गत दोन्ही घाटांच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येकी रु. 5 कोटीचा निधी मंजूर केला होता.
हा घाटमाथा रस्ता करतानाचा काही भाग राखीव वनक्षेत्रातून जात आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणे अडचणीचे होत होते हे सर्वेक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. हे सर्वेक्षण करणे सुकर व्हावे यासाठी आम. शेखर निकम यांनी तत्काळीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकजी चव्हाण यांचेकडे मांडला व मा. मंत्री अशोकजी चव्हाण यांनी संबंधित विभागाला सर्वेक्षणाबाबत निर्देश दिले होते. यामुळेच ख-या अर्थाने या घाटमाथा रस्त्याला कमालीची चालना मिळाली आहे व हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या मळेघाट निवळी नेरद मार्गे पाटण रस्ता घाट व हरपुडे- कुंडी रस्ता घाट घाटमाथ्याच्या रस्ता तयार होण्यासाठी अजून खूप मोठ्या निधीची गरज भासणार आहे तो लागणार निधी सार्वजनिक बांधकामंत्री मा. रविंद्र चव्हाण व पालकमंत्री मा. उदय सामंत यांचेकडे पाठपुरावा करुन आपण हा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास आम. शेखर निकम यांनी जनतेला दिला आहे.
या घाटमाथा रस्त्यामुळे सातारा जिल्हातील व पाटण तालुक्यातील गावांचा दळणवळणाची समस्या सुटेल, कोकणातून मळे घाट ते मुंबई पुणे जाण्यास पर्यायी मार्ग मिळेल, घाट व कोकण एकमेकाला जोडले जाईल, औद्योगिक क्रांती होईल,फलोत्पादनास व पर्यटनस्थळांना चालना मिळेल. तसेच मुख्य बाजार पेठ निर्माण होवून बेरोजगारी कमी होईल.
