मंगळूर -मुंबई एक्सप्रेसला चिपळूण हॉल्टची जोरदार मागणी

रत्नागिरी : मुंबई ते मंगळूरु दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला थ्री टायरचे दोन डबे वाढवण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा करण्यासाठी रेल्वेने हात निर्णय घेतला आहे.
मुंबई ते मंगळुरु दरम्यान रोज धावणारी 12133/12134 या सुपरफास्ट एक्सप्रेसला दिनांक 16 नोव्हेंबरच्या मुंबई ते मंगळूर दरम्यानच्या फेरीपासून तर दिनांक 19 नोव्हेंबर पर्यंतच्या मंगळूरु ते मुंबई दरम्यानच्या फेरीपर्यंत वातानुकलीत थ्री टायर दर्जाचे दोन अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.
मुंबईतून रात्री निघून कोकणात ही गाडी कोकणकन्या तसेच तुतारीच्या तुलनेत लवकर पोहोचत असल्यामुळे या सुपरफास्ट गाडीला चिपळूण थांबा देण्याची मागणी होत आहे. पनवेल ते गोव्यादरम्यान ही गाडी रत्नागिरी तसेच कणकवली हे दोनच थांबे घेते. मडगावनंतर मात्र मंगळुरू जंक्शनच्या आधी तब्बल सात स्थानकांवर ही गाडी थांबते. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी ही गाडी नेमकी कोणासाठी, असा सवाल चिपळूण स्थानकावर अवलंबून असलेल्या प्रवासी जनतेकडून विचारला जात आहे.
मुंबई-मंगळूरू एक्सप्रेसला चिपळूण स्थानकावर थांबा देण्याची प्रवाशांची जुनी मागणी आहे. यासाठी आंदोलन करण्याची वेळ प्रवासी जनतेवर येऊ नये.
शौकतभाई मुकादम, अध्यक्ष कोकण रेल्वे निवारण समिती.














