पार्किंग प्लाझामध्ये कंटेनर बफर ऑपरेशन कामाची सक्ती रद्द करावी

विकास नाईक यांचे जेएनपीए प्रशासनाकडे मागणी

पार्किंग मालक तुपाशी खाणार, स्थानिक कामगार उपाशी

उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : जे. एन. पी. ए. परिसरातील असणाऱ्या विविध बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या गाडयांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध व्हावी व रस्त्यावर वाहने उभी राहून अपघात घडू नयेत तसेच वाहन चालकांना इतर सुविधा मिळाव्यात या उद्देशाने  सेंट्रल पार्किंग प्लाझाची निर्मिती केली गेली.  परंतु आता सेंट्रल पार्किंग प्लाझा मध्ये कंटेनर बफर ऑपरेशन कामाची सक्ती केली आहे.  त्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.जे.एन.पी.ए. च्या जागेचे पार्किंग करिता दिलेल्या जागेत कंटेनर हाताळणीचे काम कसे काय होऊ शकते ? असे काम करणाऱ्या ठेकेदारावर,दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी जेएनपीए(जेएनपीटी )प्रशासनाचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ व सीएमए जयवंत ढवळे यांच्याकडे केली आहे.

        सेंट्रल पार्किंग प्लाझा मध्ये कंटेनर बफर ऑपरेशनला परवानगी दिल्यामुळे परिसरात कार्यरत असलेल्या ३३ सी. एफ. एस. च्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, ३०% काम कमी झाले आहे.  त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.  या सर्वच सी. एफ. एस. मध्ये काम करणारे  कामगार हे स्थानिक आहेत. आर्थिक नुकसानीमुळे सी. एफ. एस. व्यवस्थापन  येत्या काळात कामगार कपात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कामगार उध्वस्थ होणार आहेत.

तसेच स्थानिक वाहतूकदार जे कंटेनर वाहतुकीचे काम करीत आहेत त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. जवळपास ३०% वाहतुकीचे काम कमी झाले आहे, त्यामुळे स्थानिक वाहुतुकदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी त्यांना सुद्धा गाड्या विकाव्या लागणार आहेत व पुन्हा बेरोजगार व्हावे लागणार आहे. 

स्पीडी सी. एफ. एस. येथे बफर कंटेनर यार्ड आहे तेथून एका २० फूट  कंटेनर करीता रॉयल्टी म्हणून ४७१ रुपये मिळत असताना पार्किंग प्लाझा येथून फक्त ११७ रुपये रॉयल्टी मिळत आहे. एवढेच नाहीतर  कंटेनर ग्राउंड रेंट व हाताळणीकरिता पार्किंग मालक एका  २० फूट कंटेनर करिता ६००० रुपये व ४० फूट कंटेनर करिता  ८००० रुपये  वसूल  करीत आहे वर पार्किंग चार्जेस सुद्धा घेत आहेत .  

 जे.एन.पी.ए. च्या जागेचे पार्किंग करिता दिलेल्या जागेत कंटेनर हाताळणीचे काम कसे काय होऊ शकते ?

कंटेनर हाताळणीचे व ग्राउंड रेंट चार्जेस ठेकेदार कसा काय घेऊ शकतो ?

स्वतः जे.एन.पी.ए. हे काम न करता व 

स्वतःचे आर्थिक नुकसान का करीत आहे.असा सवाल विकास नाईक यांनी जेएनपीए प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.

हा महा आर्थिक घोटाळा आहे, घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांची चौकशीची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी एका निवेदना द्वारे जेएनपीए चे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ व सीएमए जयवंत ढवळे यांच्याकडे केली आहे. यावेळी जासईचे सरपंच संतोष घरत, शेतकरी कामगार पक्षाचे युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्किंग मालकाला आर्थिक फायदा व्हावा याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयामुळे पार्किंग मालक तुपाशी खाणार आहे परंतु स्थानिक कामगार व वाहतूकदार मात्र  उपाशी मरणार आहेत.  पार्किंग प्लाझा मध्ये कंटेनर बफर ऑपरेशन कामाची सक्ती रद्द करावी व सेंट्रल पार्किंग प्लाझा हे गाड्या पार्किंग करण्याच्या कामाकरिताच वापरावे. जे. एन. पी. ए. चेयरमन यांनी हा निर्णय  ताबडतोब रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार असा आक्रमक इशारा विकास नाईक यांनी जेएनपीए प्रशासनाला दिला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE