जबरदस्तीने टोल सुरू कराल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल : नीलेश राणे

आधी जनतेचे म्हणणे ऐका, प्रश्न सोडवा मग टोल सुरू करा

मुंबई -गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाकडे वेधले लक्ष

रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना प्रशासन जर जबरदस्तीने टोल सुरू करत असेल तर पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देतानाच, प्रशासनाने आधी जनतेचे प्रश्न, म्हणणे जाणून घ्यावे, ते सोडवावेत आणि मगच टोल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभेचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.

या सर्व प्रकाराबाबत निलेश राणे यांनी ट्विट देखील केले आहे. मुंबई गोवा महामर्गावरील हातिवले टोल नाका येथे म्हणजेच अगदी टोलच्या आजूबाजूला देखील काम पूर्ण झालेले नाही, रायगड जिल्ह्यात देखील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकणाचे काम केवळ 60 टक्केच झाले आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करणे ही जनतेवर जबरदस्ती आहे. जनतेने एकदा याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घ्यायला हव्यात. टोल ला आमचा विरोध नाही मात्र काम अपूर्ण असताना, जनतेचे प्रश्न नसोडवता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जर जबरदस्तीने अचानक टोल सुरू करू नये. भविष्यात जनता रस्त्यावर उतरली तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न देखील निलेश राणे यांनी केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून घेऊन मग टोल बाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE