वनविभाग तसेच दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
चिपळूण : पट्टेरी वाघाच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तीन संशयितांच्या मुसक्या चिपळूणमध्ये वनविभाग तसेच दहशतवाद विरोधी पथकाकडून आवळण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळच्या सुमाराची कारवाई करण्यात आली.
चिपळूण तालुक्यात चिवेली फाटा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वन विभागाला या संदर्भातील टीप मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या संयुक्त सहकार्याने पट्टेरी वाघाचे कातडे तस्करीसाठी नेणाऱ्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
कोकण पट्ट्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळत नसताना संशयितांकडे पट्टेरी वाघाचे कातडे नेमके आले कुठून याची चौकशी सुरू आहे. कारवाई पथकाकडून करण्यात आलेल्या प्रारंभिक चौकशीत तस्करीच्या या घटनेचे सिंधुदुर्ग कनेक्शन असल्याचे संशयितांकडून उघड झाले आहे. त्यात कितपत तथ्य आहे, याची चौकशी वनविभाग तसेच दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू आहे.

