प्रदेश काँग्रेसचे आज स्टेट बँक, एलआयसी कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन

सामान्य जनतेची गुंतवणूक अदानीच्या खिशात घालणाऱ्या मोदी सरकारविरोधात एल्गार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला राज्यातील सर्व एसबीआय व एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीच्या कार्यालयासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध सेलचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्यातील आंदोलनात सहभागी होत आहेत तर सातारामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार, नागपूरमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, चंद्ररपूरमध्ये माजी मंत्री सुनिल केदार, गोंदिया मध्ये माजी मंत्री नितीन राऊत, औरंगाबादमध्ये माजी मंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान ठाणे, चंद्रकांत हंडोरे नवी मुंबई, आ. कुणाल पाटील जळगाव, आ. प्रणिती शिंदे लातूर, बसवराज पाटील सोलापूर, माजी मंत्री विश्वजीत कदम पिंपरी चिंचवड यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालयी होत असलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते पदाधिकारी सहभागी होत आहेत.

अदानीच्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून आहे. संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. काँग्रेस पक्ष एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने जनतेच्या हितासाठी मोदी सरकारला जाब विचारत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE