बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू

बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या  वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील ‘रॉक क्रिक’ चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE