संगमेश्वरची युवा गायिका निहाली गद्रे शास्त्रीय संगीत अलंकार पदवीने सन्मानित!

संगमेश्वर : रिमिक्सच्या जमान्यात सध्या शास्त्रीय संगीताकडे वळण्याचा कल कमी आहे. शास्त्रीय संगीत म्हटले की भल्या पहाटे उठून रियाज करणे आले, रियाजात सातत्य ठेवणे आले. मात्र, कमी वयामध्ये आपल्या गुरु मुग्धा भट सामंत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संगमेश्वरची युवा गायिका निहाली अभय गद्रे हिने शास्त्रीय संगीतातील संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. कमी वयात अलंकार पदवीने सन्मानित होण्याचा पहिला मान निहालीने प्राप्त केल्याने तिच्यावर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शास्त्रीय संगीतासारख्या वेगळ्या वाटेवर चालताना प्रथम आत्मविश्वास असायला हवा. अधिकाधिक वेळ रियाज करण्याची मनाची तयारी हवी. याच बरोबर गुरुवर आपली अढळ श्रध्दा असायला हवी. छोट्याशा यशाने हुरळून न जाता शास्त्रीय संगीताचे शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, याचे भान मनात ठामपणे ठेवले पाहिजे. रियाज करताना वेळकाळ न पहाता आवाज लागेपर्यंत प्रयत्न करायला हवा. कमी वयात अलंकार पदवी मिळाली हे माझ्या गुरु मुग्धा भट सामंत, माझ्या कठोर आणि सातत्यपूर्ण रियाज तसेच वडील अभय आणि आईसह वेळोवेळी माझे मनोबल वाढवणारा भाऊ ओम यासह माझे सर्व संगीत साथीदार यांचे यात श्रेय आहे. -निहाली गद्रे.

वयाच्या दहाव्या वर्षापासुन निहालीने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. देवरुख येथील ललीत कला ॲकॅडमी मध्ये सौ. संगीता बापट या गुरुंकडे तीने प्राथमिक शिक्षण घेतले. रत्नागिरीच्या सौ. मुग्धा भट- सामंत यांचेकडे तीने पुढील शिक्षण घेत २०१९ मध्ये निहालीने संगीत विशारद पदवी प्राप्त केली. कोरोना काळात तीने ऑनलाइन शिक्षण सुरुच ठेवले होते. स्वतः संगीताचे ऑनलाईन शिक्षण घेत असताना निहालीने संगमेश्वर येथे प्रथमच ऑनलाईन संगीत क्लास सुरु केला आणि पहाता पहाता तिच्याकडे ४० विद्यार्थी कोरोनाकाळात ऑनलाईन पध्दतीने संगीताचे धडे गिरवू लागले होते. यात विशेष म्हणजे एक विद्यार्थीनी थेट अमेरिकेतून संगीत क्लासला उपस्थित रहात होती . सध्या निहालीच्या विद्यार्थीनी आणि विद्यार्थी संगीताच्या प्राथमिक परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आहेत. कोल्हापूर देवलक्लब येथे निहालीने संगीत अलंकारसाठी परीक्षा दिली व तीने संगीत अलंकार पदवी प्राप्तही केली. कमी वयात तीने हे यश साध्य केले आहे.

निहालीने संगीत सभा गाजवल्या असून सध्या ती स्वर-निहाली हा अभंग व नाट्यगीतांचा कार्यक्रम करत असते. रसिकांनी तीच्या गायकीला चांगली पसंती दर्शवली आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात सहकलाकारांच्या साथीने निहालीने संगीत सभेचे उत्तम कार्यक्रम केले आहेत . या क्षेत्रात ती गुरु मुग्धा भट सामंत आणि तिचे संगीत साथीदार यांच्या सहकार्याने कठोर मेहनत घेत चांगले यश मिळवेल, असा विश्वास वडील अभय व आई सौ. दीप्ती गद्रे यांनी व्यक्त केला आहे. निहाली शास्त्रीयसंगीत अलंकार पदवीने सन्मानित झाल्याबद्दल संपूर्ण तालुक्यात तीचे विशेष कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE