BPCL PROJECT : बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : मेश्राम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : देशभरात आणि रायगड जिल्हयात शेतकऱ्यांची जमिन अनेक प्रकल्पांच्या (मेगा सिटी, सेझ, विमातळ, नैना, बी.पी.सी.एल.) नावा खाली काढून घेऊन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभे केले गेले परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राथमिकता न देता कंत्राटी पध्दतीने कामगार भरती करून राजरोस पणे शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. सरकारने प्रकल्प ग्रस्त (पी.ए.पी.) कुटूंबातील किमान एका व्यक्तीला नोकरी देणे प्रकल्पग्रस्त कायद्यानुसार ( 1962 आणि 1984) बंधनकारक असतांना ही त्यावर अंमलबजावनी केली जात नाही. देशाचा विकास व्हावा याला आमचा विरोध नाही परंतु विकासाच्या नावा खाली शेतकऱ्यांचा बळी देऊ नये. शेतकऱ्यांना भूमीहीन करून मजबूर आणि मजदूर बनविणाऱ्या व्यवस्थेला आमचा विरोध आहे. येत्या 10 दिवसाच्या आत बीपीसीएल कंपनी प्रशासनाने येथील कामगारांना कामावर घेतले नाही. कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी भेंडखळ येथे दिला.

प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने व प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने रविवार दि 12 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता पी. एन. पी माध्यमिक विद्यालय पटांगण, भेंडखळ,तालुका उरण, जिल्हा रायगड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना वामन मेश्राम म्हणाले की येथील सत्ताधाऱ्यांनी येथील कामगारांना, शेतकऱ्यांना, मजुरांना नेहमी उपेक्षित ठेवले. त्यांच्या सेवा सुविधेकडे दुर्लक्ष केले. आता मात्र या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या 10 दिवसाच्या आत येथील सत्ता धाऱ्यांनी, बीपीसीएल कंपनी प्रशासनाने उर्वरित कामगारांना कामावर घेतले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनसाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता पासूनच कामाला लागा. आणि आपली ताकद सर्वांना दाखवून दया.असे आवाहन पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.यावेळी सत्ताधारी व कंपनी प्रशासनाला वामन मेश्राम यांनी जाहीर खुले आव्हानच दिले. खुले आव्हान देऊन सदर समस्या 10 दिवसाच्या आत सोडविण्याची मागणी केली.बहुजन मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नेहमी कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या पाठीशी असेल असे ग्वाही वामन मेश्राम यांनी उरण मधील ग्रामस्थांना, उपस्थितांना दिली.

प्रकल्पाच्या नावाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या जमिनी काढून घेणे आणि त्या मोबदल्यात ठरवलेल्या सुविधा न देता शेत मालकाला त्याच प्रकल्पात मजूर बनविणे हे शासक जातीचे षडयंत्र आहे. राष्ट्रव्यापी जनआंदोलनात सहभागी झाल्या शिवाय प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे समाधान होऊ शकणार नाही.तसेच ओबीसीची जाती निहाय जनगणना न करणे हेच सर्व समस्याचे मूळ आहे.त्यामुळे सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने, कायदेशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. शेतकरी,प्रकल्पग्रस्त, मजूर,कष्टकरी, वंचित, बहुजन यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र या, एकत्र लढा असे आवाहन वामन मेश्राम यांनी आपल्या भाषणातून केले.

उद्घाटक मुख्य अतिथी डॉ. सुभाष घरत (सामाजिक कार्यकर्ते, उरण ),विजय भोईर (जिल्हा परिषद सदस्य ),अजित वासुदेव ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ),अभिजीत देवानंद ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ), जिनेश्वर गजानन भगत (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ), दिपक दामोदर ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ), शितल जिवन ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ),सोनाली कौस्तुभ ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ),स्वाती महेंद्र घरत ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ), स्वामी संतोष पाटील (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ),प्रमुख अतिथी म्हणून प्राची असथ ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य, भेंडखळ),मंजीता मिलिंद पाटील (सरपंच, भेंडखळ), संगिता मेघश्याम भगत (उप सरपंच, भेंडखळ),लक्ष्मण सदानंद ठाकूर (माजी सरपंच),श्रीयस म्हस्कर (अध्यक्ष, छत्रपती क्रांती सेना, पनवेल),प्रविणदादा पाटील (RMBKS पनवेल)आदि मान्यवर उपस्थित होते.प्रमुख वक्ते म्हणून एल. बी. पाटील (रायगड भूषण महाराष्ट्र राज्य समिती),मच्छिंद्र घरत (सामाजिक कार्यकर्ते),विजय आवासकर (उप अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र),धम्मपाल जाधव (अध्यक्ष, RMBKS रायगड),मनोज महाले (सह संयोजक बहुजन क्रांती मोर्चा, महाराष्ट्र),मधुकर म्हात्रे (प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा, रायगड), सामाजिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्थानिक भूमीपुत्रांवर, प्रकल्प ग्रस्तांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. व अन्यायाचा विरोधात आवाज उठविला.

उरण तालुक्यातील भेंडखळ गावात बीपीसीएल कंपनी प्रशासनाच्या मनमर्जी कारभाराविरोधात येथील प्रकल्पग्रस्त तरुणांचे भेंडखळ बीपीसीएल प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून 17 ऑक्टोबर 2022 पासून म्हणजेच गेल्या 117 दिवसापासून साखळी उपोषण आंदोलन सुरु असून दरम्यान च्या काळात या आंदोलनाची स्थानिक प्रशासन आणि बीपीसीएल प्रशासन यांनी कुठलीच दखल घेतली नाही.हे साखळी उपोषण आजही असेच सुरु आहे. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनांनी आंदोलनाला जाहिर समर्थन दिले. प्रकल्पग्रस्त तरुणांच्या आग्रहावरुन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या आंदोलनाच्या समर्थनात जाहिर सभा घेण्याचा निर्णय घेतला होता.हि जाहिर सभा रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारि 05.00 ते रात्री 8:00 या वेळेत पीएनपी माध्यमिक विद्यालय मैदान, भेंडखळ, तालुका उरण जिल्हा रायगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर सभेमुळे आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साह संचारला होता.

या सभेला हजारोच्या संख्येने शेतकरी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.भेंडखळ बीपीसीएल प्रकल्पग्रस्त समिती, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुलनीवासी बहुजन कर्मचारी संघ तथा भेडखळ ग्रामस्थ मंडळाने या जाहीर सभेचे आयोजन केले होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मुक्षे यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक किरण घरत यांनी केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE