संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील ग्रामस्थ आणि माजी सैनिक राजाराम गणपत कदम ( ८१ ) यांचे सोमवार १३ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले .
राजाराम कदम हे १९६२ साली देशाच्या सैन्य दलात भरती झाले होते. सलग २२ वर्षे सैनिक म्हणून त्यांनी उत्तम सेवा बजावली. या कालावधीत त्यांना विविध पदकेही प्राप्त झाली होती. १९८४ साली सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर राजाराम कदम हे साडवली येथील वनाझ कंपनीत सेवेत होते. स्वतःच्या एम ८० दुचाकीने जाताना ते नेहमीच जाणायेणाऱ्यांची विचारपूस करत. अत्यंत सरळ स्वभावाचे कदम हे शिवभक्त होते. १३ मार्च रोजी सकाळी राजाराम कदम हे रिक्षाने देवरुख येथे तपासणीसाठी जात असताना त्यांना रिक्षेतच अस्वस्थ वाटू लागले. दवाखान्यात नेले असता त्यांना डॉक्टरनी मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने लोवले गावासह माजी सैनिक समितीने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
















