कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणीची विशेष मोहीम
रत्नागिरी : रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने ऑगस्ट ते ऑक्टोबर 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून १४ हजारपेक्षा अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. अशा प्रवाशांकडून कोकण रेल्वेने तीन महिन्यांच्या कालावधीत 86 लाख 67 हजार 820 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यासाठी अधिक तीव्र करणार आहे. अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास करा,तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा, असा आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.
कोकण रेल्वे च्या मार्गावर धावणाऱ्या सर्व टगाड्यांमध्ये सातत्याने तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली जात असते. ऑगस्ट ते ऑक्टोबर या गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत 14,150 विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यांच्या कडून 86 लाख 67 हजार 820 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑगस्ट 2023 मध्ये 4484 विनातिकीट प्रवाशांकडून 26 लाख 67हजार555 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबर 2023मध्ये 4888 विनातिकीट प्रवाशांकडून 27 लाख 09 हजार700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ऑक्टोबर 2023मध्ये 4778 विनातिकीट प्रवाशांकडून 32 लाख 60 हजार 565 रुपयांचादंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, यापुढे ही तिकीट तपासणीची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर सुरू रहाणार आहे. प्रवाशांनी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.