शहीद जवानाच्या नावाने उभारलेल्या शिलालेखात जवानाचे नावच चुकले!

  • लांजातील कनावजे कुटुंबीयांची तीव्र नाराजी
  • जवानाच्या कुटुंबियांना सन्मानाने बोलाविण्याचे औदार्य लांजा नगरपंचायत दाखवू शकली नसल्याने खंत

लांजा : नगर पंचायत हद्दीत शहीद जवानांच्या नावाने उभारण्यात आलेल्या शिलालेखात शहीद जवानाचे नावच चुकल्याने शहरातील कनावजे कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच या वीर जवानाच्या कुटुंबाला देखील सन्मानाने बोलाविण्याचे औदार्य लांजा नगरपंचायत प्रशासनाने दाखविले नसल्याने खेद व्यक्त होत आहे.


अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सांगता सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण देशात शिलालेख उभारण्यात आले आहेत. ज्या ज्या गावातील किंवा नगरातील देश सेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांची नावे गावात उभारण्यात आलेल्या या शिलालेखावर कोरण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना देशभरात राबवण्यात आली आहे. शहीद जवानांच्या प्रती प्रत्येक गावात आणि शहरात आदराची भावना निर्माण व्हावी आणि हे शिलालेख प्रेरणादायी ठरावेत हा त्यामागचा हेतू आहे.

लांजा नगरपंचायतीच्यावतीने उभारण्यात आलेल्या शिलालेखावर, वीरमरणप्राप्त सैनिक प्रदीप कनावजे यांचे चुकलेले नाव.


लांजा शहरात देखील शहीद जवानाच्या नावाने साटवली रस्त्यावर उद्यानाजवळ असाच शिलालेख उभारण्यात आला आहे. या शिलालेखाचे अनावरण १४ ऑगस्टला शहरात करण्यात आले. देशाच्या सीमेवर शहीद झालेले लांजा शहर हद्दीतील एकमेव वीरजवान ठरलेले प्रदीप कनावजे यांचा उल्लेख या शिलालेखावर कोरण्यात आला आहे. ऑपरेशन रक्षक मोहिमेत देशाच्या रक्षणासाठी ६ मार्च १९९७ ला शहीद झालेले हे जवान प्रदीप यशवंत कनावजे यांचा या शिलालेखातील नामोल्लेख चुकलेला आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाच्या नावा चा चुकीचा उल्लेख या शिलालेखात झाल्याने कनावजे कुटुंब कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


यासोबतच नगरपंचायत प्रशासनाने या शिलालेख अनावरण कार्यक्रमासाठी कनावजे कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले गेले नसल्याचेही या कुटुंबाने म्हटले आहे. शिलालेख अनावरण कार्यक्रम करण्याच्या काही तास अगोदर या शहीद जवानांच्या घरी जाऊन नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला बोलावले आहे असे तोंडी निमंत्रण दिले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर नगरपंचायत कर्मचारी या कुटुंबीयांच्या घरी जाऊन हे तोंडी निमंत्रण देऊन आला. केवळ औपचारिकता म्हणूनच हे निमंत्रण दिले गेले. यावरूनच नगरपंचायत प्रशासनाला या शिलालेख अनावरण कार्यक्रमाचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. याबाबत शहरातील कनावजेवाडी येथील शहीद जवान प्रदीप कनावजे यांच्या कुटुंबियांच्यावतीने रमेश कनावजे, दिलीप कनावजे, संतोष कनावजे, अशोक कनावजे, संदीप कनावजे आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान, याबाबत नगरपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी सदरहू नावे ही केंद्र शासनाच्या सैनिक मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहेत. त्यानुसारच ती शिलालेखात कोरण्यात आली असल्याचे थातूरमातूर उत्तर सांगण्यात आले. यावर कनावजे कुटुंबीयांनी सांगितले की, याबाबत सुरुवातीलाच कुटुंबीयांना विश्वासात घेतले गेले असते तर हे नाव कोरण्यापूर्वी योग्यतऱ्हेने कोरले गेले असते. नगरपंचायत या अक्षम्य चुकीबाबत गंभीर नसल्याचेच या घटनेतून पुढे येत असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE