नवी मुंबई, दि. 18 :- कोकण विभागातल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बंद असलेली ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे आणि इतर सर्व योजनांच्या प्रगतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष रहावे. सर्व योजनांना शासनाकडून देण्यात आलेले आर्थिक व भौतिक लक्षांक साध्य करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज दिल्या.
कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षात डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली कोकण विभागातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.
