उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात विमला तलाव गार्डन येथे प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला कवि संमेलनाचा मधुबनकट्टा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादामुळे नेहमी बहरत जात आहे. प्रत्येक महिन्यात १७ तारखेला कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्टा या साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्थे तर्फे कवी संमेलनाचे आयोजन केले जाते.१७ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या ९४ व्या कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कट्ट्यावर विविध विषयांवर विविध रंगी कविता सादर होतात. ज्यामध्ये सामाजिक, राजकीय, वास्तववादी कवितामुळे ऐकणा-यांना आनंद मिळत आला आहे.साहजिकच १७ तारखेचा मधुबनकट्टा उत्साहवर्धक बनला आहे.
रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, चंद्रकांत मुकादम, शाम कुलकर्णी, मारुती तांबे, राम पाटील, क. श्रा. घरत, प्रा. साहेबराव ओव्हाळ ,जीवन पाटील, जगदिश तांडेल यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेख असे सूत्रसंचालन केले. देशभक्तीवर चारोळ्या आणि कवितांनी वीररसमय वातावरण झाले. संजय होळकर, रामचंद्र म्हात्रे, भ. पो.म्हात्रे, दिलीप पाटील, सी. बी. म्हात्रे, अजय शिवकर, कुमार शिवकर, भालचंद्र म्हात्रे संजीव पाटील, रमेश म्हात्रे इत्यादी १३ कवींनी कविता वाचन केले.या मधुबनकट्टयावर तालुक्यातील तीन नागरिकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी रवींद्र सूर्यवंशी, विजय कांबळे आणि रघुनाथ बागुल यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले गेले. सुरेश मेस्त्री यांनी शेतकरी जीवनाच्या कवितेने संमेलन संपन्न केले. स्वागताध्यक्ष अजय शिवकर यांनी स्वागत आणि आभार मानले.
