मराठा सेवा संघाच्या ऐरोली येथील वातानुकूलित सभागृहाचे उद्घाटन

  • अगामी काळात सभागृहासाठी ई-अभ्यासिका उपलब्ध करुन देणार : आमदार निरंजन डावखरे

नवी मुंबई : रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्यावतीने ऐराली येथील तुळजाभवानी मंदिर इमारतीमध्ये नव्या वातानुकूलित सभागृहाचे उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवर, या संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर कदम तसेच आई तुळजाभवानी भाविक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

मराठा सेवा संघ (स्थापना १९९३) या संस्थेमार्फत सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गेली अनेक वर्षे करण्यात येते. नवी मुंबईच्या सेक्टर ८ मधील भुखंड क्र. ९५ येथे या संस्थेच्या माध्यमातून सिडकोकडून खरेदी केलेल्या भूखंडावर आई तुळजाभवानीच्या पाषाणी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरातील सभामंडपावर सामाजिक उद्देशाने सुमारे ३०० माणसांची क्षमता असलेला वातानुकूलित हॉल उभारण्याचा मानस संस्थेमार्फत ठेवण्यात आला व त्याचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे.
व्यासपीठावर दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन या कार्यक्रमास सुरुवात झाली. संघाच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवार तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.

नवी मुंबई परिसरातील मराठा समाजासह इतरही समाजघटकांना माफक दरात सभागृह उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सभागृहाची स्थापना करण्यात आली असून यास उत्तम प्रतिसाद मिळेल अशी खात्री संस्थेचे अध्यक्ष श्री. कदम यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांना ‘रत्नागिरी भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थापक अध्यक्ष अंबाजी आंब्रे यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. अध्यक्ष श्री. कदम यांच्या हस्ते फीत कापून सभागृहाचे उदघाटन करण्यात आले तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

मराठा सेवा संघाच्या सभागृह उद्घाटन व आई तुळजाभवानीची महापूजा या औचित्याने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५ हजार भाविकांनी यावेळी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन आई तुळजाभवानी कार्यक्रम नियोजन समिती, सचिव संजय दरेकर, सहसचिव मनोहर भोसले, खजिनदार अशोक तावडे, महाप्रसादासाठी नियोजन सह खजिनदार सुदेश शिर्के यांनी केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन संतोष मोरे तर आभार प्रदर्शन रुपेश कदम या कार्यकारणी सदस्यांनी केले.

अगामी काळात सभागृहासाठी ई-अभ्यासिका उपलब्ध करुन देणार – आमदार निरंजन डावखरे
रत्नागिरी मराठा सेवा संघाच्या नव्या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास कोंकण पदवीधर मतदार संघाचे आमदार व ठाणे भाजप नेते सचिन बी. मोरे आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी आमदार श्री. डावखरे यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याबाबत माहिती जाणून घेतली. या संस्थेच्यावतीने भविष्यात आता उभारलेल्या सभागृहावर आणखी एक सभागृह उभारणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. कदम यांनी मत व्यक्त केले. नव्याने उभारल्या जाणाऱ्या या सभागृहामध्ये लोकसेवा, राज्यसेवा तसेच विविध क्षेत्रात आपले भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-अभ्यासिका स्थापन करुन देण्याची ग्वाही, आमदार श्री. डावखरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना दिली.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती
आई तुळजाभवानी मंदिर सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मढवी, विनया मढवी, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष तथा ठाणे भाजप नेते सचिन बी. मोरे, तसेच उपजिल्हाप्रमुख मनोज हळदनकर, समाजसेवक राहुल पालांडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. संस्थेच्यावतीने सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष श्री. कमलाकर दादा कदम यांनी सर्व समाजबांधवांनी केलेले प्रयत्न तसेच सर्व भाविक शुभचिंतक यांची साथ आणि कार्यक्रम नियोजन व कार्यकारणी समिती यांच्या सहकार्यातून इथपर्यंत मजल मारण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे मत व्यक्त केले. तसेच यापुढेही सर्वांचे असेच सहकार्य लाभावे असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE