रत्नागिरी, दि.19 : जोपर्यंत समाजातील सर्व स्तरावरील महिलांमध्ये महिला कायदेविषयक जागरूकता होणार नाही, तोपर्यंत विविध संरक्षण यंत्रणांना त्यांना सहजरित्या मदत करणे शक्य होणार नाही. त्यासाठी महिलांनी त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक रहाणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व पंचायत समिती, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ म्हणून का साजरा केला जातो, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. गेल्या १२० वर्षापासूनचा कालखंड विचारात घेतल्यास असे दिसून येते की, ८ मार्च या दिवशी जगभरात कोठे ना कोठे महिलांनी क्रांती केलेली आहे, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे व न्याय मागण्यासाठी लढा दिलेला आहे. या शिबीरात महिलांना घटनेने दिलेले अधिकार व महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हुंडा प्रतिबंधक कायदा, विविध कायद्यातील पोटगीच्या तरतुदी, मुस्लीम स्त्री संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक भरण पोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा इत्यादी कायद्यांच्या महत्वपूर्ण तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
सध्याच्या जीवनशैलीतील बदल, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांच्या जटील समस्या व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अस्तित्वात आलेले प्रगल्भ कायदे, महिलांविषयक विविध योजना, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यातील महिलांचे संरक्षण आदेश व मार्गदर्शक तत्व याबाबत सखोल माहिती दिली. विविध प्रकारच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून स्त्रियांना जास्तीत जास्त संरक्षण देण्यासाठी शासन संस्था, न्यायसंस्था व सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत, असेही त्या म्हणाल्या.
महिलांवरील अत्याचाराची स्वरूपे म्हणजेच हुंडाबळी, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, रॅगींग, लैंगिक छळ, घटस्फोट, द्वीभार्या, स्त्रीधनाचे प्रश्न, स्त्रियांच्या संपत्तीचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार अशा सर्व प्रकारच्या महिलांवरील अत्याचारासाठी स्त्री संरक्षण कायदे तिचे खरे मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी विविध कायद्यांबाबत माहिती देताना हुंडा प्रतिबंधक कायदा, विविध कायद्यातील पोटगीच्या तरतुदी, मुस्लीम स्त्री संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक भरण पोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा इत्यादी कायद्यांच्या महत्त्वपूर्ण तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. जोपर्यंत समाजातील सर्व स्तरावरील महिलांमध्ये महिला कायदेविषयक जागरूकता होणार नाही, असे त्या म्हणाल्या.
उपस्थित महिलांना महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा देण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक सुंदर कविता सादर केली. तसेच तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांच्यातर्फे ‘कायद्याची ओळख” या पुस्तिकेचे वाटप केले. वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड. नयना पवार यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्यातील विविधी तरतुदी व अॕसिड हल्ला प्रकरणी शासनाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले.
ॲड. मोहिते व संरक्षण अधिकारी श्रीमती जाधव यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार, त्याबाबतचे संरक्षण आदेश व दंडनीय कारवाई याबाबत सखोल माहिती दिली. गट विकास अधिकारी श्रीमती घाडगे यांनी अंगणवाडी सेविकांसाठी असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. सहा. गटविकास अधिकारी श्री. कांबळे यांनी सदरील कार्यकमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन केले. वरिष्ठ लिपीक श्रीमती कासार यांनी उपस्थितांचे आभार मानले व कायदेविषयक शिबीराची सांगता केली. कार्यकमासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पंचायत समितीच्या महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
