रत्नागिरी, दि. १२ : खर्च नियंत्रक पथकांनी उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवून त्यांच्या दैनंदिन खर्चाचा अहवाल घ्यावा, असे निर्देश 46-रत्नागिरी -सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
येथील अल्प बचत सभागृहात निवडणूक खर्च आढावा बैठक झाली. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह म्हणाले, सर्व पथकांनी एसएसटी, एफएसटी, व्हिडीओ सर्व्हेलंस टिम, समन्वय अधिकारी यांनी मनापासून कामकाजात योगदान द्यावे. उमेदवारांच्या जाहिरातीचा, स्टार प्रचारकांच्या खर्चाबाबत लक्ष ठेवावे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शकाचे वाचन करावे. सावंतवाडी आणि कणकवली येथे २ जादा खर्च नियंत्रक देण्यात आले आहेत. मद्य, अंमली पदार्थ याबाबत जागृत राहून पडताळणी करावी. काही महत्वाचा विषय असल्यास तात्काळ त्याची माहिती आम्हाला द्यावी, असेही ते म्हणाले.
