कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
मुंबई, 27 एप्रिल 2024 : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज यांची पवित्र भूमी असलेल्या करवीर नगरीला व कोल्हापूरवासीयांना प्रणाम करून मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ केला. त्याआधी अबकी बार, चारसो पार अशा घोषणा देत आणि जय श्रीरामाचा जयघोष करत कोल्हापूरकरांनी मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना सन्मानाचा कोल्हापुरी फेटा बांधला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालक्ष्मीची प्रतिमा दिली, संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचा सेंद्रीय गूळ देऊन तर धैर्यशील माने यांनी संत बाळुमामांची मूर्ती देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले.आपल्या तडाखेबंद भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, इंडी आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटावर जोरदार हल्ला केला.
श्री. मोदी म्हणाले की, मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपा आणि एनडीए दोन विरुद्ध शून्य गुणांनी आघाडी घेतली आहे. इंडी आघाडीने द्वेषाच्या राजकारणामुळे सेल्फ गोल करून घेतला आहे. त्यामुळे आता फिर एक बार, गरीबो की सरकार, एसटीएसटी ओबीसी सरकार, युवा, विकास, महिला, शेतकऱ्यांचे सरकार, फिर एक बार… अशी घोषणा देत मोदी यांनी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
