उरण (विठ्ठल ममताबादे ) : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण- नेरुळ तसेच उरण – बेलापूर लोकल सेवा १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण नेरुळ व उरण बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला . उरण चा औद्योगिक विकास झाल्याने नोकऱवर्ग, विद्यार्थी, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. रेल्वे सेवा सुरू झाली त्यामुळे उरणकरांचा प्रवास अति जलद झाला प्रवासी संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे.
लोकलच्या फेऱ्या एक तासाऐवजी प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी, तसेच उरण सीएसटी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी व बेलापूर ते उरण रस्त्यावरील मालवाहतूक हा सगळा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी हजारो प्रवासांच्या हितासाठी सरकारने व रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही मागणी प्रवाशांना संघटित करून प्रवाशांच्या वतीने डॉक्टर नितीन दिघे यांनी केले आहे.
हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नोकरवर्ग या लोकलने प्रवास करत आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा अशी विनंती सर्व प्रवाशांना संघटित करून प्रवाशांच्या वतीने डॉ. नितीन दिघे यांनी केले आहे.
उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी याला कारण उरण, बामन डोंगरी ,खारकोपर एकंदर सर्वच स्टेशन वरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हि मागणी जोर धरू लागली आहे. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब,चाकरमानी मुंबई नवी मुंबई येथे घर घेऊ शकत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी सरकार आणि बिल्डरने जाहीर केले होते. लोकलसेवा प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या जातील ,पण या त्यांच्या भुलथापा आहेत हे आता प्रवाशांच्या लक्षात आले आहे. कामाला जाणेयेणे सोयीचे व्हावे म्हणून बहुतेक नोकरवर्गाने आपली कमाई, कर्ज काढून उरण नेरुळ मधील विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या नोडमध्ये घरे घेतली आहेत, परंतु उरण नेरूळ किंवा सीबीडी बेलापूर या प्रत्येक तासाला असणाऱ्या लोकलच्या फेऱ्या ह्या सर्वसामान्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. याशिवाय लोकलचे टायमिंग सकाळी पाच वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा साडेदहा नंतर नसल्यामुळे कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. सेकंड शिप किंवा उशिरा कामावरून उशीर झाल्यास प्रवाशाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या खिशालाही कात्री लागत आहे. कारण कामावरून येण्यास उशीर झाल्यानंतर पर्याय म्हणून बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे .एक बससाठी चार-पाच बसचे प्रवासी लाईन मध्ये उभे असतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिला भगिनींना गर्दीतून स्वतःच्या घरी जाण्यासाठी आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
अथक प्रयासाने लोकल सेवा चालू झाली आहे खरी परंतु अफाट गर्दीमुळे सर्वसामान्य नोकरदार वर्ग, महिला वर्ग आपला बहुमूल्य वेळ या लोकल प्रवासामध्ये घालवत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबालाही वेळ देण्यास त्याच्याकडे वेळ नाही. या भागातील विद्यार्थ्यांसाठी कॉलेज किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबई नवी मुंबई हा प्रवास दररोज करावा लागतो. त्याचप्रमाणे उरण मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णासाठी मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागत आहे. त्यात एक तासाला लोकल असल्यामुळे विद्यार्थी नोकरदार वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक एक तास स्टेशनवर दुसऱ्याला रेल्वेसेवेची वाट पहावी लागते. त्यामुळे त्यांचेशैक्षणिक नुकसान होत असल्याने कित्येक विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण मुंबईत घेणे बंद केले आहे.
