रत्नागिरी /मुंबई : रत्नागिरी ते दादर दरम्यान सुमारे वीस वर्षे व्यवस्थितपणे सुरू असलेली पॅसेंजर गाडी दिव्या ऐवजी पुन्हा दादरपर्यंत नेण्यासाठी यापुढे आक्रमक पाठपुरावा केला जाईल. मुंबई ते चिपळूण तसेच मुंबई रत्नागिरी अशा स्वतंत्र गाड्या सुरू करण्यासाठी आपण रेल्वेकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी दिले.

गोव्यात मडगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी गेलेले निमंत्रित तसेच रेल्वेप्रेमी यांच्या एका शिष्टमंडळाशी मडगांव मुंबई रेल्वे प्रवासातच भेट झालेल्या खासदार विनायक राऊत यांनी कोकण वासीयांच्या रेल्वे समस्या व्यवस्थितपणे समजून घेतल्या. या प्रवासादरम्यान रेल्वेप्रेमी तसेच रेल्वेविषयक अभ्यासक यांच्याकडून खासदार विनायक राऊत यांनी कोकणवासियांच्या प्रलंबित रेल्वे समस्यावर सविस्तर चर्चा केली.
दिनांक 3 जून रोजी गोव्यात वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते. मात्र ओडिशा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे असले तरी कोकण रेल्वे मार्गावर धावण्यासाठी सज्ज असलेली वंदे भारत एक्सप्रेस तिच्या नियमित सभेसाठी नियोजनानुसार मुंबईला नेण्यात आली आहे. दिनांक 3 रोजी होणारा वंदे भारत एक्सप्रेस चा शुभारंभ कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मडगाव मध्ये खास या कार्यक्रमासाठी गेलेले रेल्वेप्रेमी, पत्रकार, रेल्वे विषयक जाणकार तसेच रेल्वेचे अधिकारी हे दि. 3 जून रोजी मडगाव येथून सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका विशेष ट्रेनमधून मुंबईच्या दिशेने निघाले होते.
याचदरम्यान या ट्रेनमध्ये रत्नागिरी स्थानकावर रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांनी मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. यावेळी गाडीतच असलेल्या रेल्वेप्रेमी, रेल्वे विषयक अभ्यासक तसेच काही पत्रकार मंडळी यांनी कोकण रेल्वेशी संबंधित प्रलंबित असलेल्या समस्यांसंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान वीस वर्षांपासून सुरू असलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यापर्यंत थांबत असल्याचे व त्यासाठी पाठपुरावा सुरू असूनही कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडे ही गाडी पूर्ववत दादर येथूनच सुरू करावी अशी जोरदार मागणी असल्याचे खासदार विनायक राऊत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
याचबरोबर सावंतवाडी दिवा ही गाडी दिव्या ऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा दादर पर्यंत न्यावी, मुंबई चिपळूण तसेच मुंबई रत्नागिरी अशा स्वतंत्र गाड्या सुरू कराव्यात अशी कोकणवासीय जनतेची असलेली मागणी प्रलंबित असल्याचे खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणण्यात आले. या समस्यांवर खासदार राऊत यांनी आपण रेल्वेकडे त्यासाठी आक्रमकपणे पाठपुरावा करू असे आश्वासन रेल्वे प्रवासात भेटलेल्या या शिष्टमंडळाला दिले आहे.
या शिष्टमंडळात पत्रकार, रेल्वे विषयक जाणकार, अलीकडच्या काळात रेल्वेच्या सेवेला लोकांपर्यंत पोहोचवण्यात योगदान देणारे युट्युबर्स यांचा समावेश होता.















