या पदांवर काम करण्यास आम्ही इच्छुक नसून आमचा पूर्णपणे विरोध ; जि. प. सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती शाखा लांजाची भूमिका
लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पदांवर योग्य त्या बेरोजगार तरुणांची नेमणूक करावी. या पदावर काम करण्यास आम्ही इच्छुक नसून या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचा एकमुखी निर्णय आणि ठराव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती शाखा लांजाच्या बैठकीत करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जि. प. सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती शाखा लांजाची कार्यकारिणी व सभासदांची संयुक्त बैठक सांस्कृतिक भवन लांजा येथे संपन्न झाली. तालुका अध्यक्ष मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संघटनेच्या विविध समस्यांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात आला.
सद्यस्थितीत तालुक्यात रिक्त असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या पदांवर रुपये २० हजार मानधनावर आणि ७० वर्षे वयाखालील सेवानिवृत्त शिक्षकांची जि प शाळांच्या रिक्त पदांंवर नेमणूक करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे शासन स्तरावरील या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध होत असतानाच याबाबत या सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती शाखा लांजाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात हजारो डीएड, बीएड, एम एड व अन्य पदवीधर बेकार तरुण तरुणी हे आहेत. अशा परिस्थितीत या तरुण-तरुणी यांच्या विषयी सहानुभूती आणि एक सामाजिक बांधिलकीची जपणूक या दृष्टिकोनातून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करून सदर रिक्त असलेल्या तालुक्यातील शिक्षकांच्या पदांवर या बेरोजगार असलेल्या तरुणांची नेमणूक करावी. सदर पदावर काम करण्यास आम्ही इच्छुक नसून या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचा निर्णय या सभेत या संघटनेच्या वतीने घेण्यात आला असून तसा ठराव देखील करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष मुबारक शेख यांनी दिली.
या बैठकीला तालुकाध्यक्ष मुबारक शेख, कार्याध्यक्ष श्याम सुर्वे, सरचिटणीस विश्वास तळसंदेकर, तसेच उपाध्यक्ष दीपक कोरगावकर, तसेच विभाष शेट्ये, शंकर मुळे, विजय साळस्कर, प्रदीप गावडे, शांताराम चिपटे, रामचंद्र पवार, आदी उपस्थित होते.
