Mumbai-Goa Highway | महामार्गावर हातखंबा येथे कंटेनरची ट्रकला धडक 

नाणीज, दि.१९: मुंबई -गोवा महामार्गावर हातखंबा गाव येथे दर्ग्याजवळील उतारावर  शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरने ट्रकला मागून जोरदार धडक दिली.  या अपघातात सुदैवाने त्यात कोणीही जखमी नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून हातखंबा ते निवळी घाटादरम्यान कंटेनर अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे

अपघाताबाबतची माहिती अशी- हा कंटेनर यू के ०८सीबी ०५८०   गोवा ते मुंबई व पुढे उत्तर प्रदेशला चालला होता. त्याच्यावर चालक अमरचंद महावीरप्रसाद जाट ( ३३) रा. राजस्थान हा होता. हातखंबा येथील दर्ग्याजवळ त्याचा वाहनवरील ताबा सुटला. त्यामुळे तो पुढे चाललेल्या ट्रकवर (एचआर ५५ एल ०९००) मागून आदळला. ट्रकचा चालक सुरेंद्र सरदार सिंग, (४५, रा. होशियारपूर पंजाब) हा होता. अपघातातील दोन्ही चालकांना कसलीही दुखापत झालेली नाही.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार अपघातस्थळी होते.  दोन्ही वाहने क्रेनच्या मदतीने हलवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. 

महामार्ग पोलीस केंद्र हातखंबाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE