रत्नागिरी : पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्याभरातील पत्रकार आंदोलन करित आहेत. गुरुवारी रत्नागिरीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने याबाबत आंदोलन करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
जळगाव पाचोडा तालुक्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला असून अद्यापही पत्रकार हल्ला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आतापर्यंत राज्यभरात केवळ ३७ पत्रकारांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, अद्यापही याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास प्रशासन कमी पडत आहे. काही हल्ल्यांमध्ये पत्रकारांना जीव सुद्दा गमवावा लागला आहे तरी याची अंमलबजावणी होत नसल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने गुरुवारी पत्रकार हल्ला संरक्षण कायद्याची होळी करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेकडूनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना याविषयी निवेदन सादर करण्यात आले, त्यानंतर जयस्तंभ येथे पत्रकार कक्षाजवळ या कायद्याची प्रतींची जाळून होळी करण्यात आली.

यावेळी जान्हवी पाटील, हेमंत वणजू, आनंद तापेकर, राजेश शेळके, मुश्ताक खान, प्रशांत पवार, जगदीश कदम, भालचंद्र नाचणकर, जमीर खलफे , सतीश पालकर, रहीम दलाल, प्रशांत हरचेकर, सिद्धेश मराठे आदी उपस्थित होते. या कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मराठी पत्रकार परिषदेकडून देण्यात आला आहे.
