खेडसह संगमेश्वरवासियांना रेल्वे बोर्डाकडून मोठी खुशखबर!!!

खेडमध्ये मंगलासह एलटीटी-कोचुवेली एक्सप्रेस तर संगमेश्वरला नेत्रावती एक्सप्रेस थांबणार

रत्नागिरी : रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातीतील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवेली एक्सप्रेस गाडीला तर संगमेश्वरवासियांची दीर्घ काळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे.

संगमेश्वरवासियांचा यांचा लढा यशस्वी

कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी चिपळूण संगमेश्वर फेसबुक समूहा च्या माध्यमातून संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन संदेश जिमन यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संगमेश्वरवासियांच्या या दीर्घ लढ्याला अखेर यश आले आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवरील गाड्यांना जे काही प्रायोगिक थांबे दिले आहेत त्यात संगमेश्वरवासियांच्या नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश झाला आहे.

खेडवासीयांना आणखी एक नवी भेट!

याचबरोबर मुंबई ते मडगाव या मार्गावर अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळालेल्या खेड स्थानकाला रेल्वेने आणखी एक भेट दिली आहे. एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस तसेच एलटीटी ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला खेड थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खेडवासीयांना आणखीन दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

रोहा स्थानकावर नेत्रावतीसह दिवा- एक्सप्रेसला थांबा

कोकण रेल्वे मार्गावरील रोहा स्थानकाला देखील रेल्वे बोर्डाने खुशखबर दिली आहे. या स्थानकावर दिवा सावंतवाडी एक्सप्रेस तसेच नेत्रावती एक्सप्रेसला प्रायोगिक थांबा मंजूर करण्यात आला आहे.

रेल्वे बोर्डाने त्या त्या झोनला पाठवलेल्या पत्रात प्रायोगिक थांबा मंजूर केलेल्या गाड्यांना नवीन थांब्यावर थांबवण्याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार शक्य तितक्या लवकर करण्याबाबत सूचित केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE