दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली ७६ लाखांची दारू उरण-जासई येथे पकडली

  • उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथे जेएनपीटी परिसरात दिव-दिमण येथून, परदेशी दारु येणार असल्याची पक्की खबर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना मिळाली होती, आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. शनिवार (दि. २३ सप्टेंबर २०२३) रात्रीच्या सुमारास जासई उरण येथे ३ संशयीत ट्रेलरची तपासणी केली. त्यावेळी या तीन बाराचाकी ट्रेलरमध्ये मॅकेडॉल व्हिस्की आणि सिग्नीचर व्हीस्कीचे भरलेले दारुचे बॉक्स तपासात आढळून आले.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सहआयुक्त सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त यतिन सावंत,राज्य उत्पादन शुल्क विभाग (ठाणे रेंज) चे उपायुक्त प्रसाद सुर्वे , राज्य उत्पादन शुल्क (रायगड) चे अधिक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे दुय्यम निरीक्षक प्रविण एस. माने, सुहास दळवी यांनी ही कारवाई केली.

या तीन बारा चाकी ट्रेलर (ट्रक) मधून ७६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, सिग्नेचर व्हिस्की २२८० बॉक्स, तर मॅकेडॉलचे ३७५ बॉक्स एवढा माल जप्त केला आहे. तसेच ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात हरिश्चंद्र गोरख गायकवाड (पाटोदा-बीड) मोहम्मद वसीर (मकदूमनगर- सुलतानपूर (उ.प्र.) देवीदास तांदळे (आष्टी-बीड) यांना अटक करुन तीन १२ चाकी ट्रेलर आणि ३ कंटेनर्स जप्त करण्यात आले आहेत. सदर दारुचा पुरवठा कोणाकडे जाणार होता त्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. अशी माहिती दुय्यम निरीक्षक प्रविण माने यांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE