पैसा फंडच्या कला विभागातर्फे रेखाटनाचे प्रात्यक्षिक

  • चरकोल वापराचे मार्गदर्शन ; चित्रकार सतीश सोनवडेकर यांची उपस्थिती

संगमेश्वर दि. २ : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचालित पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या कलाविभागातर्फे प्रशालेतील कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून आज पुणे येथील प्रसिद्ध चरकोल आर्टीस्ट सतीश सोनवडेकर यांच्या चरकोलचा वापर करुन व्यक्तीचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

प्रशालेच्या कलाविभागातर्फे चित्रकार सतीश सोनवडेकर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. दररोज किमान एक स्केच केल्याशिवाय सोनवडेकर घरी जात नाहीत, पुण्यात झपुर्झा येथे व्यक्तीचित्रण करण्याचे काम गेली अनेक वर्षे सोनवडेकर हे करीत आहेत. सततच्या सरावामुळे त्यांचा चरकोल आणि पेन्सिलवर चांगलाच हात बसला आहे. सोनावडेकर यांच्या स्केचिंगचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे आवाहन याप्रसंगी कलाविभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.

रेखाटन कसे करावे, चरकोलाचे प्रकार किती आहेत आणि चरकोल कसा तयार केला जातो, चरकोलाचा वापर कसा केला जातो याबाबतची प्राथमिक माहिती देवून चित्रकार सोनवडेकर यांनी आपल्या प्रात्यक्षिकला सुरुवात केली. रेखाटन कसे करावे, त्याचे प्रमाण कसे असते, चरकोल्यावर किती दाब द्यायचा, छायाप्रकाश किती महत्वाचा असतो, अशी विविध प्रकारची माहिती देत सोनवडेकर यांनी केवळ एका तासात ८ वी च्या वर्गातील आरोही सावंत या विद्यार्थिनीचे हुबेहूब स्केच साकारले. सोनवडेकर यांनी स्केच खाली स्वाक्षरी करताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

व्यक्तीचित्रण प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकाचे चित्रकार सोनवडेकर यांनी निरसन केले. रेखाटनाच्या निमित्ताने आपण राज्यभर फिरत असतो, पैसा फंड सारखा कलावर्गा आणि कलादालण आपल्याला अन्यत्र पाहायला मिळाले नाही. व्यापारी पैसा फंड संस्था कला विषयाला प्रोत्साहन देत असल्याबद्दल सोनवडेकर यांनी संस्था पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. आपण या कलावर्गात परत नक्कीच प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी येवू असे सोनवडेकर यांनी स्पष्ट केले. कलावर्गाच्या वातीने चित्रकार सतीश सोनवडेकर यांना चपराक प्रकाशनची पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली.

संस्था कलाविषयाच्या पाठी

संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था ही या दशक्रोशीतील खूप जुनी संस्था आहे. आजवर असंख्य विद्यार्थी संस्थेच्या प्रशालेतून शिकून बाहेर पडले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कला विषयाकडे असणारा कल पाहून संस्थेने स्वतंत्र कला वर्ग आणि कलादालन उभारले आहे. कला विभागातर्फे विविध कलाकारांची प्रात्यक्षिके होत असतात. व्यापारी पैसा फंड संस्था कला विषयाच्या पाठी ठाम उभी आहे. पुणे येथील चित्रकार सतीश सोनवडेकर हे चारकोल मधील एक ख्यातनाम कलाकार आहेत.

धनंजय शेट्ये
संस्था सचिव.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE