उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक २२ /०१/२०२४ रोजी आयोध्या येथिल श्री राम मंदिरामध्ये श्री राम मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याअनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार व उरण विधान सभा क्षेत्राचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेनुसार व माननीय जिल्हाधिकारी महोदय, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९/०१/२०२४ रोजी उरण नगर परिषद हद्दीत विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.
सदर विशेष मोहिमेंतर्गत उरण शहरातील उरण -मोरा रोड, गणपती चौक, राममंदिर परिसर, देऊळवाडी येथील दत्तमंदिर, शंकर मंदिर, उरणावती देवी- शितलादेवी मंदिर परिसर तसेच बोरी येथील सदानंद अधिकारी चौक परिसर, पाटील आळी, भवरा आदी ठिकाणी रस्ते, पदपथ इत्यादी झाडून पाण्याने धुवण्यात (डीप क्लीन करण्यात) आले. तसेच महात्मा गांधी पुतळा येथे रंगकाम करून झाडांच्या कुंड्या ठेवून सुशोभीकरण करण्यात आले. शहरातील सर्व भिंतीना रंगरंगोटी करून आकर्षक भित्तीचित्र काढण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, बांधकाम अभियंता, नगर अभियंता, आरोग्य निरीक्षक, उरण नगर परिषदेचे मुकादम व सफाई कर्मचारी यांनी श्रमदान केले. उरण नगर परिषद शाळा क्र.१, २, ३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेवून श्रमदान केले. याप्रकारे स्वच्छता मोहीम दर महिन्याला होत असल्याने उरण शहर स्वच्छ तसेच सुशोभित होत चालले आहे.

