देवरूख : मूळचे देवरूखचे कै. रामचंद्र सप्रे हे
भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनच्यावतीने सलग दहाव्या वर्षी जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. चेसमेन संस्थेचे तांत्रिक रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण रोख एक लाख रुपयांची बक्षिसे, आकर्षक चषक आणि पदक स्वरूपात देण्यात येणार आहेत.
दिवंगत रामचंद्र सप्रे यांच्या कार्याची दखल घेत चेसमेन आणि केजीएन सरस्वती फौंडेशन २०१३ पासून रत्नागिरीत कै. रामचंद्र सप्रे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करत आहे. यंदा स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. करोना काळातदेखील हा वारसा सुरू ठेवावा म्हणून स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यंदा जलद आणि अतिजलद स्पर्धेत बक्षिसांची लयलूट होणार असून मुख्य बक्षिसांसोबातच १५, १३, ११, ०९, ०७ वर्षांखालील गट तसेच ज्येष्ठ नागरिक गट, उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू अशा विविध प्रकारात खेळाडूंना प्रोत्साहनपर चषक, रोख रक्कम आणि पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
कै. रामचंद्र सप्रे हे मुळचे देवरूखातील आहेत. भारतात १९५५ साली झालेल्या पहिल्या वहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते होते. त्यांनी १९५६ आणि १९६० साली झालेल्या जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले सप्रे उत्कृष्ट बुद्धिबळ विश्लेषक म्हणून ओळखले जात. सत्तरच्या दशकात त्यांनी ५ राष्ट्रीय निवड स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून काम केले होते. इंडिअन एक्स्प्रेस, मिड-डेसारख्या वृत्तपत्रांतून ते त्याकाळी होणाऱ्या बहुतांश सर्व मुख्य स्पर्धांबाबत स्तंभलेखन करत.
जिल्हातील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
