छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरघोस वाढ

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
  • पहिल्या क्रमांकास रु.5 लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.3 लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु.2 लाख

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रुपये 75 हजार पारितोषिकाची रक्कम रुपये दोन लाख, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली अन् ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू -प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदूमून गेला.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) सन 2023-24, ठाणे या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे व सोळा मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी या मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशी यांना आदरांजली वाहत स्व.मनोहर जोशी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, बुवा साळवी यांचेही यासाठी अमूल्य योगदान होते, या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या खेळाडूंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे, याचा अभिमान आहे. राज्यातील खेळाडू गुणवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडूंना आणि युवकांना खेलो इंडिया, फिट इंडिया च्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेने 1 कोटी 11 लाख रुपये इतका निधी दिला आहे. कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा. मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला, यासाठी शासनाच्यावतीने मैदानी खेळांसह पारंपारिक “क्रीडा महाकुंभ” भरविण्यात येणार आहे. खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन खेळाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवावा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील क्रीडांगणास “धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी” असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ आणि गणेश वंदना हे कलाविष्कार सादर केले.


क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी प्रास्ताविकात या स्पर्धेबाबतची माहिती उपस्थितांना दिली. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राणाप्रताप तिवारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी मैदानास श्रीफळ वाढवून व खेळाडूंची भेट घेवून त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE