रत्नागिरी : मराठी भाषेच्या वाढीसाठी व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी केले. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन अल्प बचत भवनात करण्यात आले होते.

यावेळी तहसिलदार (सर्वसाधारण) हनुमंत म्हेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, व्याख्याते माधव अंकलगे, मेस्त्री हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती साठे म्हणाल्या, मराठी भाषेतील कवी, लेखक, नाटककार, कथाकार म्हणून ओळखले जाणारे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म दिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा ही आपली बोली भाषा असून, या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर सर्वत्र करणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, तिचा प्रचार, प्रसार व्हावा, या उद्देशाने जिल्हा मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली आहे.
श्रीमती रजपूत म्हणाल्या, या राज्यात राहणाऱ्यांनी मराठी भाषेचा सन्मान करायला हवा. मराठी भाषेला संताची परंपरा आहे. आपल्याला चांगली मराठी येणे गरजेचे आहे. मातृभाषा प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय असतो. तसा तो आपल्याला आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा अभिमान आहे. आपले राज्य हे भाषावार प्रांत रचनेनुसार मराठी भाषिक राज्य आहे. भाषा म्हणून मराठीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मराठी भाषेने स्थानिक भाषेत संपर्क भाषा म्हणून आजवर स्थान कायम राखले आहे. आपण जर मराठी भाषेचा आग्रह धरला तर, मराठी भाषेचा टक्का नक्कीच वाढणार आहे. मी महाराष्ट्रीयन आहे आणि माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी संपर्क भाषा म्हणून मराठीचाच वापर करणार असा, निर्धार प्रत्येक मराठी भाषक व्यक्तीने केला तर मराठीचा उत्कर्ष निश्चित आहे सोबतच विस्तारही त्याच वेगाने होईल.
14 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 पर्यत मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक जयंत कदम, द्वितीय क्रमांक विजय कुमार बिळूर, तृतीय क्रमांक सोनल चव्हाण व अर्चना पटवर्धन यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावेळी व्याख्याते माधव अंकलगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास यावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत कदम व आभार प्रदर्शन तहसिलदार श्री. म्हेत्रे यांनी केले.
