- रत्नागिरीत स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला जोरदार सुरुवात
- सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : 8 मार्च पर्यंत चालणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला काल येथील स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहात जोरदार सुरुवात झाली. सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन आणि नटराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

या उद्घाटन सोहळयाप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप बलखंडे, नमन लोककलाचे जिल्हाध्यक्ष पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते, सचिव परशुराम मासये, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, समनव्यक नंदु जुवेकर, मनोहर जोशी, श्रीधर खापरे आदी उपस्थित होते.

‘पहिले नमन धरतीला…दुसरे नमन चाँद सूर्याला..’ गात कलाकारांनी आपली नमन कला सादर केली. यानंतर वाघजाई देवीचे गुणगान झाल्यानंतर भस्मासुराची कथा सादर करण्यात आली. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नमन या लोककलेचा आस्वाद घेतला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 6 ते 8 मार्च नमन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काल पहिल्या दिवशी श्री देवी वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख संचप्रमुख पांडुरंग रमेश लाड, बळीवंश कलामंच कांदिवली (पूर्व) मुंबई संचप्रमुख सागर डावल आणि झरेवाडी नाट्य नमन मंडळ मंदरुळ, संचप्रमख परशुराम भानू मासये यांनी आपली कला सादर केली. अभिजित गोडबोले यांनी यावेळी सूत्रसंचलन केले.

- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | खेड रेल्वे स्थानकातून लवकरच होणार कंटेनर वाहतूक
