कोकण रेल्वे प्रवाशांनो, लक्ष असू द्या.. शुक्रवारची तेजस मांडवीसह जनशताब्दी एक्सप्रेसही धावणार विलंबाने!

  • कोकण रेल्वे मार्गावर १५ मार्चला अडीच तासांचा मेगाब्लॉक
  • एकूण पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवाशांनो, इकडे लक्ष असू द्या, तुम्ही जर शुक्रवारी ( दिनांक 15 मार्च 2024 ) या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. राजापूर रोड ते सिंधुदुर्ग दरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याने या मार्गावर जाणाऱ्या तेजस मांडवी तसेच जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या विलंबाने धावणार आहेत. याचबरोबर दोन गाड्या सुधारित वेळापत्रकानुसार चालविल्या जाणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर दि. १५ मार्च २०२४ रोजी राजापूर ते सिंधुदुर्ग या स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असाच अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

विलंबाने धावणाऱ्या गाड्या

  • १) मेगा ब्लॉकच्या कारणामुळे मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (10104) ही 15 मार्च रोजी ची मांडवी एक्सप्रेस गोव्यातील करमाळा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी स्थानकादरम्यान २० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
  • २) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस (12051) ही दिनांक 15 मार्च रोजी प्रवास सुरू होणारी गाडी रत्नागिरी ते राजापूर रोड स्थानकादरम्यान २० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
  • ३) मेगाब्लॉकच्या दिवशी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी आणखी एक सुपरफास्ट गाडी तेजस एक्सप्रेस (22119) ही गाडी देखील रत्नागिरी ते राजापूर रोड स्थानकादरम्यान २० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

या गाड्या सुधारित वेळापत्रकानुसार चालवणार!

१) 15 मार्च 2024 रोजी च्या मेगाब्लॉकमुळे मडगाव जंक्शन ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणारी (50108) ही पॅसेंजर गाडी या दिवशी मडगाव जंक्शन येथून एक तास वीस मिनिटे उशिराने सुटणार आहे.
२) सावंतवाडी पॅसेंजरचा रेक वापरून चालवली जाणारी (10106) सावंतवाडी रोड ते दिवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी सावंतवाडी रोड येथून दोन तास पाच मिनिटे विलंबाने सोडली जाणार आहे.

दि 15 मार्च 2024 रोजीच्या कोकण रेल्वे मार्गावर होणारे या मेगाब्लॉकमुळे वेळापत्रकावर परिणाम होणाऱ्या पाच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE