जादा भाडे आकारणाऱ्या बस आणि भाडे नाकारणाऱ्या रिक्षाची तक्रार करा या मोबाईल नंबरवर!


रत्नागिरी, दि. २३ : जादा भाडे आकारणाऱ्या बस मालकांविरुध्द व जादा भाडे आकारणी करणाऱ्या/ भाडे नाकारणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरूध्द पुराव्यानिशी लेखी स्वरुपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई- मेल आडी dyrto.08-mh@gov.in अथवा ८२७५१०१७७९ या कार्यालयाच्या WhatsApp क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.


खासगी बस वाहतूकदारांनी राज्यात आगामी सुरू होणाऱ्या शिमगोत्सव सणाच्या अनुषंगाने शासनाने निश्चित केलेल्या भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारु नये व क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिमगोत्सव सणाच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवून खासगी बसेसची कडक तपासणी करण्यात येत आहे. त्या नुसार दिनांक २२ मार्च रोजी जिल्ह्यातील १० तात्पुरता परवाना नसलेल्या तसेच २ बॅज नसणाऱ्या अशा एकूण १२ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांकडून ३ लाख रुपये इतकी दंड वसुली अपेक्षित आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा
अधिक राहणार नाही (मूळ भाडे + ५०% अधिकचे भाडे) असे कमाल भाडेदर शासनाने दि. २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE