Good News| आजपासून सलग तीन दिवस पनवेल, रत्नागिरीसाठी मेमू लोकल ट्रेन धावणार!

  • चिपळूण -पनवेल आज दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार
  • पनवेल येथून रत्नागिरीसाठी मेमू निघणार रात्री नऊ वाजता

रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी मार्गावर ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढती गर्दी लक्षात घेऊन वाढवण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी ३ वाजून 25 मिनिटांनी चिपळूण येथून पनवेलसाठी पूर्णपणे विनाआरक्षित लोकल गाडी धावणार आहे. हीच गाडी नंतर स्वतंत्र गाडी म्हणून पनवेल येथून रात्री नऊ वाजता रत्नागिरीसाठी सुटणार आहे. चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी या मार्गावर सलग तीन दिवस मेमू लोकल धावेल.

होळीसाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले आहेत. अशातच होळीसाठी रोहा ते चिपळूण मार्गावर आधी जाहीर करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या मध्य रेल्वेने नंतर रद्द केल्या. या रद्द केलेल्या गाडीच्या ठिकाणी चिपळूणकरिता पर्यायी गाडी जाहीर करण्यात आली नाही.

मात्र आता वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 4 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी फक्त रविवारी जाहीर करण्यात आलेल्या चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहे.

आठ डब्यांची मेमू ट्रेन पूर्णपणे अनारक्षित गाडी
रेल्वेने आधी जाहीर केल्याप्रमाणे चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मेमू ट्रेन फक्त रविवारसाठी सोडण्यात येत होती. मात्र आता शनिवारी 30 मार्च तसेच सोमवारी दि. १ एप्रिल २०२४ रोजी देखील आठ डब्यांच्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या होणार आहेत. ही मेमू लोकल गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे.

शनिवार आणि सोमवारच्या या मेमू लोकलबरोबरच याच वेळापत्रकानुसार आधी जाहीर केलेली रविवारी देखील मेमू लोकल देखील धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 01160 ही मेमू ट्रेन चिपळूण येथून दि. 30 मार्च तसेच 1 एप्रिल 2024 रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
याचबरोबर पनवेल येथून रत्नागिरी साठी 01159 ही मेमू लोकल दिनांक 30 मार्च व १ एप्रिल 2024 रोजी रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे रत्नागिरीला तीन चार वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.

फेऱ्या वाढवण्यात आलेल्या मेमू लोकलचे थांबे आधीपासूनच धावत असलेल्या मेमू लोकलप्रमाणेच राहणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE