कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा

आजपासून स्वीकारणार पदभार

रत्नागिरी : संतोष कुमार झा हे आज दि. १ एप्रिल २०२४पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहेत. श्री. झा हे 1992 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी आहेत.

नव्याने पदभार स्वीकारत असलेले संतोष कुमार झा यांनी M.Sc. , लखनौ विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई येथून मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. कोकण रेल्वेच्या चेअरमन पदी नियुक्तीपूर्वी संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक (ऑपरेशन आणि कमर्शियल) म्हणून काम केले आहे.

त्यांना ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये 28 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. संतोष कुमार झा यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषवले आहे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक युनिट्सचे नेतृत्व केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये त्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळणे यात त्यांचा हातखंडा आहे. प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.संतोष कुमार झा 1एप्रिल रोजी कोकण रेल्वे च्या बेलापूर येथील मुख्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE