रत्नागिरी, दि. 4 : मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत विशेष भर द्यावा. ज्या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे, ते प्राधान्याने पूर्ण करावे, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निश्चित किमान सुविधा (एएमएफ) बाबत आढावा बैठक झाली. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपन शिंदे, बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार आदींसह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान केंद्रांवर वीज, आवश्यक फर्निचर, पंखे, रॅम्प, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे, ती प्राधान्याने करुन घ्यावी. पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाबाबत आदेशाची बजावणी करावी, असेही ते म्हणाले.
