- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक
रत्नागिरी : मतदार चिठ्ठ्यांचे वाटप ‘बीएलओ’ मार्फत झाले पाहिजे. हे वाटप 1 मे पर्यंत संपले पाहिजे. त्यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.
येथील अल्पबचत सभागृहात विधानसभा मतदार संघनिहाय क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी अजित थोरबोले आदी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य व जबाबदाऱ्या यात विशेषत: मतदान पूर्व आणि मतदान दिवशीची जबाबदारी याचा विशेष समावेश होता.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, मतदारांना ‘व्होटर इन्फॉरमेशन स्लीप’ अर्थात मतदार चिट्टीचे वाटप बिएलओमार्फत पूर्ण करावे. याचे वाटप झाले की नाही, याबाबतही खातरजमा करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.
