- चपराक प्रकाशनची निर्मिती ; संगमेश्वरच्या जे. डी. पराडकर यांचे लेखन
पुणे ११ : मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांनी लिहिलेल्या ‘वेध अंतर्मनाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक घनश्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून गतवर्षभरात चपराक प्रकाशनने जे. डी. पराडकर यांची एकूण आठ पुस्तके प्रकाशित केली आहेत. एकाच लेखकाची केवळ कोकण या विषयावर प्रकाशित केलेली सलग आठ पुस्तके म्हणजे मराठी साहित्य विश्वातील हा एक विक्रम असल्याचे मत चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी व्यक्त केला आहे.

वेध अंतर्मनाचा या पुस्तकात कोकणातील विविध घटकांवर केलेले लेखन नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरणार आहे असा विश्वास व्यक्त करताना युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनी या पुस्तका विषयी अधिक मत व्यक्त करताना कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दांतून उजागर करणारा संवेदनशील लेखक म्हणून जे.डी. पराडकर हे नाव आता मराठी साहित्यात सर्वश्रुत झाले आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कोकणला शब्दांच्या माध्यमातून चित्रांकित केले आहे. कोकणचा निसर्ग, तेथील माणूस, त्याच्या भावभावना, गावमातीचे अनोखे गंधसंवेदन यांस अतिशय ताकदीनं त्यांनी आपल्या लेखणीत बद्ध करून वाचकांपर्यंत पोहचवलं आहे आणि त्याचे वाचकांनी चांगले स्वागतही केले आहे. हायटेक काळात पैशाच्या बळावर अतोनात सुविधा आपल्या दिमतीला आल्या आहेत मात्र आपण मोलाचे काही गमावून बसलो आहोत याची जाणीव व्हायला फार वेळ लागते. तेव्हा हातातून सारं काही निसटून गेलं आहे हे आपल्याला जाणवतं. आपल्यातून आधी आपण गाव गमावून बसलो संवेदना गमावून बसलो, अशा काळात जे. डी. पराडकर यांच्यातील लेखक तुम्हाला पुन्हा त्या जगात नेऊन तुमच्या अंतर्मनाचा तळ ढवळून काढत तुम्हाला पुन्हा त्या दिवसांपाशी घेऊन जातो. आपण जे जिथे सोडून आलो आहे. त्याच्याशी साक्षात उभं करतो. कोकणच नाही तर कुठल्याही गावमातीत जगलेल्या माणसाला हे लिखाण आपल्याच भावभावनांचं प्रतिबिंब वाटेल. यातच लेखक म्हणून जे. डी. पराडकर यांचं लेखक म्हणून यश आहे. त्यांनी आठवणींचे उत्खनन करून जो ओलावा ‘वेध अंतर्मनाचा’ या ललितगद्यातून समोर ठेवला आहे. हे पुस्तकही त्यास अपवाद नाही. मोठमोठी शिखरे पादाक्रात करणारी माणसे तुम्हास भेटू शकता मात्र माणसाच्या मनापर्यंत पोहचणे ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. संवेदनशीलता आणि भावनिकता ज्या माणसाकडे असेल त्यास ही गोष्ट अवघड नाहीच. जे. डी. पराडकर हा लेखक पराकोटीचा भावनिक असल्याने कोकणच्या गावमातीची शिदोरी आपल्या समोर घेऊन आला आहे.
‘वेध अंतर्मनाचा’ या पुस्तकाचे वाचक निश्चितच स्वागत करतील. यात काही शंका नाही असे मत ऐश्वर्या पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. या पुस्तकासाठी आकार डीजी नाईन या यूट्यूब चॅनेलचे संचालक प्रभाकर सूर्यवंशी यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी लेखक जे. डी. पराडकर यांनी गुढी सोबतच वेध अंतर्मनाचा या पुस्तकाचे पूजन करून मराठी नववर्षाचे आगळेवेगळे स्वागत केले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ युवा चित्रकार प्रणय फराटे यांनी केले असून सुलेखन, निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबागदार यांनी केले आहे. वाचकांनी हे पुस्तक मागविण्यासाठी चपराक प्रकाशन ७०५७२९२०९२ या व्हाट्सअप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षभरात आपली एकापाठोपाठ एक अशी दर्जेदार आठ पुस्तके प्रकाशित होणे, हे केवळ चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांच्यामुळे शक्य झाले आहे . वाचकांनी या सर्वच पुस्तकांचे भरभरून स्वागत केले. मराठी नववर्षानिमित्त चपराक प्रकाशनने या आठही पुस्तकांवर सवलत योजना लागू केली असून, वाचनालयांसह वाचकांनी या योजनेचा लाभ घेऊन वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत करावी, असे आवाहन लेखक जे. डी. पराडकर यांनी केले आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
