महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

  • महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी, दि. 1  : आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले, तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपू या. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.


येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. सामंत शुभेच्छा संदेशात म्हणाले, आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन साजरा होत आहे. या मंगल, पवित्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान व बलिदान दिलेल्या अनेक पुण्यात्म्यांची, समाज सुधारकांची आठवण ठेवून, महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.
छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लोक कल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची गौरवशाली आणि प्रतिभाशाली वाटचाल सुरु आहे.
महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.


महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं, हे सप्रमाण सिध्द करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देतो.


ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. परेड कमांडर पोलीस निरीक्षक रमेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी संचलन केले. यामध्ये विविध पोलीस पथकांसह बँड पथक, श्वान पथक, अग्निशमन दल आदींचा समावेश होता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE