आरवली : ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. रामभाऊ मराठे आणि माखजन पंचक्रोशी यांच अत्यंत जिव्हाळ्याच नातं होतं.मूळच्या कळंबूशी गावचे असणारे पंडित राम मराठे यांचे आरवली गावाशी विशेष संबंध होते. पंडित रामभाऊ मराठे यांचे दोन भाऊ कै.केशव गजानन मराठे आणि कै.रघुनाथ(मनोहर)गजानन मराठे हे जवळपास चाळीस पन्नास वर्षे आरवली मध्ये वास्तव्यास होते. तसेच आरवली मधील पाटणकर कुटुंबीयांचे ते जावई त्यामुळे रामभाऊंचे त्या काळात आरवली मध्ये नियमित येणे जाणे होत असे.अनेक वेळेला गावातीलच संगीतातील माहितगार लोकांच्या साथीने श्री देव आदित्य नारायणाच्या समोर रामभाऊंच्या झालेल्या गायन सेवेच्या मैफिली प्रत्यक्ष ऐकलेल्या अनेकांच्या आठवणीत आहेत.
कै.पंडित रामभाऊ मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या सगळ्या आठवणी जागृत करण्याचा प्रयत्न म्हणून श्री देव आदित्य नारायण देवस्थानच्या वर्धापन दिन उत्सवात मंगळवार दिनांक १४ मे २०२४ या दिवशी ‘संगीतभूषण एक आठवण ‘ हा सांगितीक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांच्या सहभागाने होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सलग दोन वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्तम ऑर्गन वादनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारे श्री.हर्षल काटदरे आणि पंडित अजितकुमार कडकडे आणि अनेक दिग्गजांना तबला साथ करणारे श्री.रुपक वझे हे अनुक्रमे ऑर्गन आणि तबला साथ संगत करणार आहेत.
