रत्नागिरी जि. प. शाळांमधील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड

  • अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा  :  जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह


रत्नागिरी, दि. 29 : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 गुणवत्ता परीक्षेतून 23 हजार विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची ‘नासा’ ला जाण्यासाठी निवड करण्यात आली. आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस, आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, इंजिनियर बनावे. पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे. मी वयाच्या 25 व्या वर्षी प्रथम विमानात बसलो. तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. 23 हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली, हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल, यशस्वी करिअर घडवा. गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात. तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE