राजापूरमध्ये फासकीत अडकलेल्या ‘ब्लॅक पॅंथर’ला वन विभागाकडून जीवदान!

राजापूर :  राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील एका आंबा कलमाच्या बागेला लावलेल्या तारेच्या फासकित काळा बिबट्या (ब्लॅक पॅंथर ) अडकल्याची घटना बुधवारी घडली असुन राजापूर वनविभागाने या ब्लॅक पॅंथरची फाअकीतुन मुक्तता करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश मिळवले आहे.
याबाबत वनविभाग राजापूर यांच्याकडुन मिळालेल्या माहिती नुसार दिनांक 26/06/2024 रोजी मौजे- कुवेशी येथे श्री. हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाउंडला लावलेल्या तारेच्या फासकित वन्यप्राणी काळा बिबट्या (Black Panthar) अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकार यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली .त्यानंतर सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन तारेच्या फासकित अडकलेल्या बिबट्याला फासकी मुक्त करण्यात राजापूर वनविभागाच्या अधिकाऱ्याना यश आले.
सदर काळ्या बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यात घेऊन पशू वैद्यकीय अधिकारी राजापूर प्रभास किनरे व पशुधन विकास अधिकारी श्रीम. प्राजक्ता बारगे यांचे कडून बिबट्याची तपासणी करुन घेतली व सदर काळा बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री करुन राजापूर वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे .
सदर काळा बिबट्या (Black Panthar) नर जातीचा असून त्याचे वय सुमारे ५ ते ६ वर्ष असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे . त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे ,वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याचे नैसर्गिक अदिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सदर कामगिरीसाठी विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई , सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक श्री निलेश बापट ,वनपाल राजापूर जयराम बावदाणे ,वनपाल पाली न्हानु गावडे , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, अनिकेत मोरे , महेश धोत्रे , नितेश गुरव, संतोष चव्हाण , निलेश म्हादये उपस्थित होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE