रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीकाळात माणसांपुढे उदभवणाऱ्या समस्या या बातम्यांचा विषय बनतात. मात्र, मुक्या प्राण्यांचे काय? त्यांचा कोण विचार करणार? अशी व्यथा मांडणारं एक बोलकं छायाचित्र रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. जयंतराव जोशी यांनी टिपलं आहे.

तुम्ही माणसं घरातल्या लोडाला टेकून आजुबाजूला कोसळणारा पाऊस दारं आणि खिडक्यांमधनं एन्जॉय करता… पण पावसात भिजल्यामुळे ओल्या अंगाचे आम्ही तुमच्या घरात नाही, पण नुसते पडवीत आडोशाला आलो तरी आम्ही अंग झटकताना पाणी उडतं म्हणून हाकलून देता, अशी या श्वानाची व्यथा सांगण्यासाठी हे छायाचित्र पुरेसं आहे.
पावसा, तु पडायला हवासच पण, पडायचं ते किती रे ? आता तूच सांग… इतक्या पावसात आम्ही मुक्या प्राण्यांनी बसायचं तरी कुठे? असा प्रश्न छायाचित्रातला हा श्वान विचारत नसेल कशावरून?
