नाणीजच्या सुंदरगडावर रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळ्याची सुरुवात

  • भर पावसात नाणीजमध्ये हजारो भाविक दाखल : श्रद्धा – भक्तीचा संगम

नाणीज, दि. २० : येथील सुंदरगडावर उद्या रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळा होत आहे. त्याची सुरुवात आज ढोल ताशांच्या गजरात देवदेवतांना निमंत्रण देणाऱ्या मिरवणुकांनी झाली. भर पावसात येथे हजारो भाविक येण्यास सुरुवात झाली आहे.


आज सकाळी मंत्रघोष सुरू झाला अन सारे वातावरण श्रद्धा व स्नेहाने भारून गेले. आपल्या लाडक्या जगद्गुरूंचा जयघोष सुरू झाला. त्यानंतर श्री सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग सुरू झाला. अन्नदान विधीही झाला. वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री शौचेगुरुजी यांनी त्याचे नेतृत्व केले.

सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सर्व देवदेवतांना उद्याच्या सोहळ्याचे निमंत्रण मिरवणुकीने जाऊन देण्यात आले. ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुका झाल्या. त्यात ध्वजधारी स्त्री-I पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते. अनेक स्त्रियां हिरव्या साड्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरापासून सुरु झाली. निमंत्रण देऊन नाथांच्या माहेरमधून निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी हत्तीण नारायणी होती. ही मिरवणूक निमंत्रण देत वरद चिंतामणी मंदिर, पुढे प्रभू श्रीराम मंदिर मार्गे सुंदरगडावर संतशिरोमणी जमीन महाराज मंदिर येथे आली. नाथांचे माहेर मंदिराचे यजमानपदाची जबाबदारी उत्तर रायगड मधील भाविकांवर सोपविण्यात आली आहे. वरद चिंतामणी मंदिराची सांगली जिल्हा सेवा समितीकडे, प्रभू रामचंद्र मंदिराची उत्तर नगरकडे आहे, तर मुंबई सेवा समितीने सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिराचे यजमानपद स्वीकारले आहे. जोरदार पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वहात होता
आज सकाळी सद्गुरू काडसिध्येश्वर महाराज रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर सुरू झाले. नामवंत डॉक्टरांचे पथक तपासणी व उपचार करीत आहेत. शिबीर उद्याही नऊ ते पाच या वेळेत सुरू आहे. भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद सुरू झाला आहे.

येथे आठवडाभर जोराचा पाऊस आहे. तरीही भक्तांची पावले सुंदरगडाकडे वळत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने भाविक येत आहेत. अगदी उद्या सकाळ पर्यंत गुरुपूजनाची पर्वणी गाठण्यासाठी भाविकांची गर्दी वाढतच राहील . सर्वानाच आता उद्याच्या गुरुपूजनाचे वेध लागले आहेत.

दरम्यान उद्या रविवारी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. गुरुपूजन हेच उद्याचे मुख्य आकर्षण आहे. सकाळी ८.३० ते १२ पर्यंत संतपीठावर गुरुपूजन सोहळा आहे. भाविक संतपीठासमोर बसून विधिवत गुरुपूजन करतील. दुपारी चरणदर्शन व अन्य धार्मिक कार्यक्रम आहेत. रात्री ७.३० ला प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. सोहळ्याचा समारोप सर्वांचे आकर्षण असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अमृमय प्रवचनाने होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE