मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधून वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून बोरीवली स्थानकातून मडगावसाठी रवाना केले. आता या गाडीच्या (10115/10116) नियमित फेऱ्या मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहेत.

मागील अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मुंबईच्या पश्चिम उपनगरातून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या पहिल्या कायमस्वरूपी गाडीचा गुरुवारी दुपारी बोरवली रेल्वे स्थानकात शुभारंभ सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह बोरिवली, दहिसर, मागाठणे येथील स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत वांद्रे ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शुभारंभाची गाडी कोकणच्या दिशेने रवाना झाली.
असे आहे वेळापत्रक ⬇️⬇️

पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या या पहिल्या गाडीच्या शुभारंभ सोहळ्यासाठी मुंबईस्थित कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय शिवाजी जय भवानी, गणपती बाप्पा मोरया अशा गगनभेदी घोषणांमध्ये गाडीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पियुष गोयल यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू झाल्याने त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
